Monday, June 29, 2009

विठ्ठ्ला पांडूरंगा

***** आजची वात्रटिका *****
**********************

विठ्ठ्ला ss पांडूरंगा !

पंढरीच्या वाटेवरी
भडकवली मस्तकं
जुनीच पुस्तकं
उचकुन ॥१॥

वड्याचे तेल वांग्यावर
प्रकार हे सुरू
कोण कुणाचे गुरू?
जगजाहिर ॥२॥

भोळे वारकरी
त्यांच्या भक्तीची लुट
पडली फुट
दिंड्यांमध्ये ॥३॥

तुझ्याच भक्तांना
तुच सांग पांडूरंगा
नको हा दंगा
भक्तीसोहळ्यात ॥४॥

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

भांडा सौख्य भरे

भांडा सौख्य भरे

लहान-लहान मुलांसारखे
एकमेकांना चिड्वू लागले.
वास्तवाची जाण असतानाही
स्वबळाची राड उडवू लागले.

भांडा सौख्य भरेच्या नाटकाचा
प्रयोग तर हीट झाला आहे !
स्वबळावर लिहून लिहून
आम्हांलाही वीट आला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मायकल जॅक्सन

मायकल जॅक्सन

त्याचे जगणेही वाद्ग्रस्त होते
त्याचे मरणेही वादग्रस्त आहे.
त्याच्या चाहत्यांसाठी तर
हा फक्त देहाचाच अस्त आहे.

जे वेडावले त्याच्यासाठी
ते खरोखरच धन्य होते !
भारतात थिरकले पाय त्याचे
ते शिव उद्योगाचे सौजन्य होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अरे चोरांनो.......



अरे चोरांनो.......

चोरली कुणाची कविता तर
निदान चोरी खपली पाहिजे.
कविता चोरावी अशी की,
ती आपल्याला झेपली पाहिजे.

चोरी ती चोरीच
कधी ना कधी फुटली जाते.
उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट
वाचकांनाही पटली जाते.

इतर चोर्‍यांप्रमाणेच
कवितेचीही चोरी पचत नाही !
कारण काळीज हालल्याशिवाय
कविता कधी सुचत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)


Sunday, June 28, 2009

दोघांत तिसरा.....

***** आजची वात्रटिका *****
**********************

दोघांत तिसरा.....

युतीच्या संसारातला
हा टर्निंग पॉंईट म्हणूया.
धनुष्य़बाण म्हणाला कमळाला,
आता दोघात तिसरा आणूया.

एवढ्या वर्षाचे प्लॅनिंग
त्यालाच आता तडा आहे !
अख्खा महाराष्ट्र जाणतो
नेमका कुणामुळे हा राडा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
http://suryakantdolase.blogspot.com

Saturday, June 27, 2009

जागृतीचा सवाल

***** आजची वात्रटिका *****
**********************

जागृतीचा सवाल

देव-देवतांचे अनुक्रमही
सोयीनुसार लावले जातात.
फक्त जागृत देवस्थानेच
म्हणे भक्तांना पावले जातात.

देवधर्माचा धंदा करायला तर
काही लोक टपलेले असतात !
काही देव जागृत तर
बाकीचे काय झोपलेले असतात ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com

Friday, June 26, 2009

गुणवत्तेचे शल्य

******छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*****

***** आजची वात्रटिका ******
**********************

गुणवत्तेचे शल्य

गुणांच्या चढाओढीत
गुणवत्तेचा वास्तु झाला.
पालकांच्या दॄष्टीने तर
विद्यार्थी एक वस्तु झाला.

पालकांची वाढती अपेक्षा
हेच गुणवत्तेचे मूल्य आहे !
विद्यार्थी यंत्र झाले
हेच गुणवत्तेचे शल्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com

Wednesday, June 24, 2009

जातीय विसंगती

****** आजची वात्रटिका ******
************************

जातीय विसंगती

शाळेत दाखल होताच
सोबत जातही दाखल होते.
जात कशी रुजवली जाते?
याची इथे खरी उकल होते.

जात हटवा,जात हटवा
वरवरचा मलम असतो !
कोणताही अर्ज भरा,
तिथे जातीचा कॉलम असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 23, 2009

चॅनलची न्यूज

****** आजची वात्रटिका ********
*************************

चॅनलची न्यूज

चॅनलवाल्यांचे काही सांगू नका,
ते सुईचेही दाभण करतात.
वांझोटीलाही ते
बोलून बोलूनच गाभण करतात.

बातम्या दाखविण्याऎवजी
ते बातम्या पिकवित आहेत !
उरलेल्या वेळेमध्ये
ते गुन्हेगारी शिकवित आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com

Monday, June 22, 2009

अशी ही सातार्‍याची तर्‍हा

***** आजची वात्रटिका *****
**********************

अशी ही सातार्‍याची तर्‍हा

लोकांना तिकीट मागावे लागते
त्यांच्या गळ्यात घातले होते.
आज उतल्यासारखे वाटले तरी,
काल त्यांचे तेच जितले होते.

असंतोषाचा उदय-न झाला तर
नक्कीच नवल वाटले असते !
त्यांचे आज नाही तर उद्या
अगदी नक्कीच फाटले असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com

Sunday, June 21, 2009

चॅनलचे’प्रिन्स’पल

****** आजची वात्रटिका ******
************************

चॅनलचे’प्रिन्स’पल

जीवन-मरणाचे नाट्यही
कॅमेर्‍यासमोर घडावे लागते.
मुलांनो,प्रिन्स व्हायचे असेल तर
त्यासाठी खड्ड्यात पडावे लागते.

जीवन-मरणाचे खेळही असे
एक्सक्लुसिव्ह सिन्स होतात !
टी.आर.पी.त वाढ होऊन
सामान्यांचेही ’प्रिन्स’ होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
http://suryakantdolase.blogspot.com/

आमच्या नजरेतला पाऊस

आमच्या नजरेतला पाऊस

पाऊस पुरता राजकारणी
लहरी त्याचे येणे असते.
पाऊस दाटतो डोळ्यात
माती काळ्या बाजाराचे बेणे असते.

पाऊस कृत्रिम तो कृत्रिम
खाल्ल्या मिठाला जागत नाही.
पाऊस तसा भ्रष्टाचारीच
फक्त नडून-आडून मागत नाही.

पाऊस सरकारसारखा हायब्रीड
त्याच्या कोसळण्याचा नेम नाही.
पाऊस जलात्कारी,
पाऊस बलात्कारी.
त्याच्या कोसळण्यात प्रेम नाही.

पाऊस बेईमान असला तरी,
त्याला बेईमान म्हणवत नाही !
तसे त्याचे उपकारच,
खताची टंचाई तरी जाणवत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

बाप

**** आज ’फादर्स डे’ निमित्त बाप माणसांना हार्दिक शुभेच्छा !!****

बाप

बाप एक
नांव असतं ;
घरातल्या घरात
बागुलबुवा नावाचं
गांव असतं !

सर्वात असतो
तेंव्हा जाणवत नाही ?
नुसत्या नजरेचा इशारा आला
तरीही नाही म्हणवत नाही !!

आई सांगते,
मुलं थरथरतात
घाबतलेल्या मनात
काटे सरसरतात.

बाप काना-कानात
तसाच ठेऊन देतो कांही.
हाताचे कानाला कळावे
असे देऊन जातो कांही.

बाप असतो
एक धागा
सारे समजूनही
भावनाविवश न होणारी जागा.

घर उजळत तेंव्हा ,
त्याचं असतं भान
विझून गेला अंधारात की ;
वाट्ते आता
कुणी पिळायचे कान ?

बाप घरात नाही ?
तर मग कुणाशी बोलतात
या अनाथ
दिशा दाही ?

बाप खरंच काय असतो ?
लेकराचा बाप असतो,
जरी डोक्याला ताप असतो.
ज्याच्या नशिबी फक्त
रागीट्पणाचा शाप असतो!!

बाप असतो
जन्माची शिदोरी,
फ.मुं.च्या आईसारखीच !
सरतही नाही,
उरतही नाही.

बाप एक
न कळालेलं गाव असतं !
नसतो तेंव्हा,
बिनबापाचे
हे नाव असतं !!

(कविवर्य फ.मुं. शिंदे यांची मन:पूर्वक क्षमा मागून)

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com

Saturday, June 20, 2009

अंदाज पावसाचा

पाऊसनामा

पाऊस म्हणजे लॉटरी,
पाऊस म्हणजे सट्टा असतो.
नको तेंव्हा नको तिकडे
कमी दाबाचा पट्टा असतो.

अस्तिक आणि नास्तिकांचीही
पाऊस बरोबर जिरवतो.
दुष्काळी ढग घेऊन
पाऊस उरावर मिरवतो.

पुढून झाकावे तर
मागून उघडे करतो !
शासन आणि प्रशासनही
पाऊस नागडे करतो !!
********************************
आपत्ती व्यवस्थापन

तो मुसळ्धार होताच
ती गड्बडून जाते.
तीचे आपत्ती व्यवस्थापन
मग कोलमडून जाते.

ती हतबल होत
अखेर त्याला शरण जाते !
तीच्या आपत्ती व्यवस्थापनाचे
त्याच्यापुढे मरण येते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

पावसाची बदनामी

***** आजची वात्रटिका ******
***********************

पावसाची बदनामी

मान्सूनचा सगळा लाड
वेधशाळेकडून पुरवला जातो.
पावसासारखा पाऊसही
उगीच बेमोसमी ठरवला जातो.

ग्रामीण भागात तर त्याला
अवकाळी गाभडे व्हावे लागते !
समजून उमजूनही पावसाला
उगी़च भोळेभाबडे व्हावे लागते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Thursday, June 18, 2009

’कायम’ ची मुक्तता

***** आजची वात्रटिका *****
**********************

’कायम’ ची मुक्तता

अनुदान मिळेल तेंव्हा मिळेल
कायम हा शब्द हटला गेला.
भाकरीबरोबर तुकड्यांचाही
प्रश्न कायमचा मिटला गेला.

संस्थाचालकांसह शिक्षकही
कायमचेच आंबलेले होते !
कुणाकुणाचे पाळणे तर,
कुणाचे लग्नही लांबलेले होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com/

अंदाज पावसाचा

***** वात्रटिका ******
******************

दगाबाज मान्सून

वेळेवरती निघाला तरी
मान्सून मध्येच दडी मारतो.
वादळाचा फाय़दा घेत
दुसरीकडेच उडी मारतो.

आमची खात्री पटलीय
तो उशिर का लावत असतो ?
टॅंकर सम्राटांच्या नवसाला
तो भरभरून पावत असतो !
*************************

मान्सूनचे राजकारण

अगदी वेळेवरती येईल
तो मन्सून कसला आहे?
त्याच्या लहरीपणामुळेच
प्रत्येक व्यवहार फसला आहे.

त्याला इथल्या राजकारणाचा
वाणाबरोबर गुणही लागू लागला !
लहरी असणारा मान्सून
बदमाशासारखा वागू लागला !!

*************************

(च्या) आयला

वेधशाळेचा अंदाज
पुन्हा खोटा करून गेला.
एका वादळामुळे मान्सून
वाकडी वाट करून गेला.

शेवटी मान्सून तो मान्सून
बोलून-चालून लहरी आहे !
(च्या) आयला वादळाची
वाटचालच जहरी आहे !!

*************************

अंदाज पावसाचा

तिला त्याच्या हवामानाचा
कधी अंदाज येत नाही.
त्याच्या वादळाची शक्यता
कधी मनावर घेत नाही.

अंदाज नसतानाही तो
मुसळधार होऊन कोसळतो.
तिच्या गाफीलपणामुळे तो
लाटा होऊन उसळतो.

त्याचा वेध घेण्यासाठी
ती बर्‍याच शाळा करते !
मनातल्या मनात मग
पावसाशी चाळा करते !!
**********************************

ओबामाची माशीमारी

ओबामाची माशीमारी


मारून मारून काय तर?
ओबामाने एक माशी मारली
हे मात्र विचारू नका,
ती ब्रेकींग न्यूज कशी ठरली?


मरणारापेक्षा मारणारा
इथे महत्त्वाचा ठरला गेला !
एका माशीचा मरणसोहळा
सार्‍या जगात फ़िरला गेला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, June 16, 2009

मास्तर एके मास्तर

मास्तर एके मास्तर

चित्रपटाने बदनामी होते
मास्तर,आम्हांला शिकावू नका.
निशा्णी म्हणून डावा अंगठा
आमच्यासमोर टेकवू नका.

चित्रपट हा चित्रपट असतो
उगीच पिंजर्‍यात अडकू नका.
सुशीलाची अपेक्षा ठेवता
उगीच कुणावर भडकू नका.

मास्तर एके मास्तर
असे म्हटले तरी घसरू नका !
गुरू: साक्षात परब्रम्ह
हा सन्मानही विसरू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Monday, June 15, 2009

प्रिय अण्णांस,

** ज्येष्ट समाजसेवक अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा **

******* आजची वात्रटिका ********
***************************

प्रिय अण्णांस,

अण्णा,
तुम्हांला हज्जारदा सांगितले
तरी तुम्हांला आमचे पटत नाही.
इथे सारेच षंढ
कुणाचे साधे डोकेसुद्धा उठत नाही.

आता ईश्वर करो अन
तुम्हा आम्हांला एकच सुबुद्धी होवो !
राळेगणचा हा सिद्धी
तुमच्या आमच्या अंगात येवो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, June 14, 2009

मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....



मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

विसरून गेलोत इतिहास आम्ही
विसरून गेलोत पराक्रम
आमच्या डोक्यात पाणी झालेय
त्याची तेवढी वाफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा
तेच बोंबलत हिंडत आहेत.
घराघरातल्या आजच्या जिजाऊ
सासवांसोबत भांडत आहेत.
हे सारे बदलण्यासाठी
कुणातही टाप नाही.
तुम्ही तेवढी टाप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

घराघरातला शिवाजी
व्हिडीओ गेम खेळतो आहे.
जंक फुड खाऊन खाऊन
टि.व्ही.समोर लोळतो आहे.
घराघराचा कार्टून शो होतोय
हा बॅड शो तेव्हढा फ्लॉप करा
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

बाहेर खेळायला जावे तर
कुठे मावळ्यांचा पत्ता आहे?
साचलेल्या उकांड्यावरती
कावळ्यांचीच सत्ता आहे.
कॄपया , घर आणि डोक्यातले
उकांडे तेव्हढे साफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

गनिमी काव्यासाठी तर
टि.व्ही.वाले लपलेले आहेत.
कोणताही चॅनल लावा,
सारे खानच खान टपलेले आहेत.
आमच्या चिकटलेल्या डोळ्यांची
जरा उघडझाप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

केस तेव्हडे वाढलेले,
पोकळ मात्र मस्तकं आहेत.
फार थोडी घरं सापडतील,
जिथे मुलांसाठी पुस्तकं आहेत.
आम्ही पापाचेच वाटेकरी
तरी होईल तेव्हढे पाप माफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

राम-कृष्णांचा वारसा सांगुन
पुढच्या गोष्टी तुम्हांला
अगदी सोप्या करता आल्या.
इथली इरसाल लेकरं सांगतील,
आई-बापांच्या सहकार्यामुळेच
आम्हांला कॉप्या करता आल्या.
आई-बापांचेही खरे आहे,
कशाला म्हातारपणी ताप करा?
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

तुमच्यासारखी आई असली की,
लेकरांना आपोआप
स्वराज्याची शपथ घ्यावी लागते.
आज मात्र बळजबरीने पकडून,
कॉप्या न करण्याची शपथ द्यावी लागते.
पुन्हा गुरुजी चुकले तर
त्यांच्या हाताचे काप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

आंधळ्या परंपरेचे
इथे सगळे पाईक आहेत.
कित्तीही ओरडून सांगा,
सारे बहिरोजी नाईक आहेत.
किटलेल्या कानातला मळ
तेल ओतून साफ करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

राजेपद वारसा हक्काने मिळते,
पण शिवबा घडवावा लागतो.
जाणतेपणाचा दुर्मिळ गुण
दागिण्यासारखा जडवावा लागतो.
जरा मर्यादा सोडून वागतोय,
संभाजीसरखा नातू मागतोय.
आम्हांला तुमच्यासारखी आई,
शहाजी राजांसारखा बाप करा.
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....
मॉंसाहेब,आम्हांला माफ करा.....

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ऐतिहासिक धडा

ऐतिहासिक धडा


इतिहासात लढाया असतात,
आता इतिहासासाठी लढाया आहेत.
केवळ शाब्दिक बु्डबुड्यांनी
एकमेंकावर चढाया आहेत .


जिंकले जरी कुणीही
तो विजय क्षणिक ठरला जाईल !
वर्तमानाच्या ह्या लढायात
खरा इतिहास हारला जाईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Saturday, June 13, 2009

मराठी-मराठी

****** आजची वात्रटिका ******
************************

मराठी-मराठी

मराठी माणसांचा पुळका
सरकारलासुध्दा आला
भुमिपूत्रांना प्राधान्य
हा सरकारी मुद्दा झाला.

शेवटी हेच म्हणावे लागेल,
जे होते ते चांगल्यासाठी आहे !
आता प्रत्येकाच्या डोक्यावर
मराठीचीच पाटी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

Friday, June 12, 2009

आपले सवडशास्त्र

आपले सवडशास्त्र


शास्त्र आवडीनुसार नाही,
शास्त्र सवडीनुसार चालत असते.
पर्याय उपलब्ध असतील तर
शास्त्र निवडीनुसार चालत असते.


गैरसोय होत असेल तर
परंपराही सहज मोडल्या जातात !
चंद्राऎवजी घड्याळाकडे पाहूनच
हल्ली चतुर्थ्याही सोडल्या जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

पालखी सोहळे

पालखी सोहळे


राजकीय महत्वाकांक्षा तर
रोकठोक आणि बोलक्या आहेत.
सत्तेच्या दिंडीमध्ये
आपापल्या पालख्या आहेत.

चालता सत्तेची पायवाट
आंधळी त्यांची नजर आहे.
हे सोहळे असे की,
इथे खुर्चीनामाचा गजर आहे.

खुर्ची नामाच्या गजरात
जिंदाबादची जोड असते !
ज्याला त्याला आपापल्या
पंढरीचीच ओढ असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, June 11, 2009

लोकशाहीचे मारेकरी

लोकशाहीचे मारेकरी


खुनाचे आरोप झाले तरी
सत्तेची हौस जिरली नाही.
नैतिकता नावाची गोष्ट
राजकारणात उरली नाही.


दोष किंवा निर्दोष
जरी पर्याय दोन आहेत !
तरी लोकांना माहिती झालेय
लोकशाहीचे मारेकरी कोण आहेत?


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

निलंबनाचे रहस्य

निलंबनाचे रहस्य

विरोधाचा जोर वाढताच
राजकीय वादळ उठले जाते.
जे नेहमीच उशिरा होते
त्यालाच निलंबन म्हट्ले जाते.


उशिरा सुचलेल्या शहाणपणापुढे
नैतिकता नावाची ढाल असते !
पक्षीय निलंबन म्हणजे तर
तात्पुरती राजकीय चाल असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, June 10, 2009

ऎतिहासिक चुका

******आजची वात्रटिका******
***********************


ऎतिहासिक चुका

हा मामलाच जसा काय
सवती-सवतीचा आहे ?
पुन्हा एकदा वादात
इतिहास चौथीचा आहे.

कुणी काही घुसडतात,
कुणी काही वगळीत आहेत !
त्यांच्या पदरी काय पडणार ?
जे कोळसे उगळीत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...