Wednesday, September 30, 2009

बंडखोरीचा आढावा

***** आजची वात्रटिका *****
*********************

बंडखोरीचा आढावा

कुणाला चुचकारले,
कुणाला बोचकारले,
कुणाला समजून घेतले गेले.
काही बंडोबांकडून मात्र
ऐनवेळी शेपूट घातले गेले.

खरे बंडोबा,खोटे बंडोबा
अखेरच्या क्षणी दिसून गेले !
कुणाच्या हाती लॉटरी,
कुणाचे बंड फसून गेले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 29, 2009

स्वप्नाळू जाहिरनामे

****** आजची वात्रटिका ******
************************

स्वप्नाळू जाहिरनामे

सर्वांच्याच जाहिरनाम्यात
अगदी स्वप्नाळू चित्र असते.
जसे प्रियकर-प्रेयसीने
एकमेंकास लिहिलेले पत्र असते.

वचने,आणाभाका,शपथा
देताना प्रेमात आंधळे होतात !
जाहिरनामे पेलणारे नसतात
पण सत्तेपोटी वेंधळे होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

रावण दहन

***** आजची वात्रटिका ****
********************

रावण दहन

एवढे सारे जाळले तरी
पुन्हा रावण कुठुन येतात?
पुढ्च्या विजयादशमीला
पुन्हा नव्याने त्रास देतात.


देखावा म्हणून आपण
सारेच रावण जाळत असतो !
आपापल्या मनात एकेक
सारेच रावण पाळत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 28, 2009

रावण दहन

दसरा शुभेच्छा

गॉडफादर ते गॉडमदर

***** आजची वात्रटिका *****
***********************

गॉडफादर ते गॉडमदर

घराणेशाहीचे नमुने तर
सर्वांकडूनच सादर आहेत.
लेकरांसाठी तळमळलेले
राजकीय ’गॉडफादर’ आहेत.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत
त्यांच्याच पिलावळी घुसल्या आहेत !
गॉडफादर माहीत होते,
गॉडमदरही दिसल्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, September 27, 2009

चंद्रावर पाणी !

****** आजची वात्रटिका ******
***********************

चंद्रावर पाणी !

विज्ञानाच्या प्रगतीशीलतेची
ही एक नवी कहाणी आहे.
त्यांनी हे समजून घ्यावे,
ज्यांच्या डोक्यातच पाणी आहे.

टॅंकर सम्राटांचे डोके चालले
आता खोर्‍याने पैसा ऒढता येईल !
यापुढे टॅंकरचे बिल तर
थेट चंद्रापासून काढता येईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

प्रचारातील मुडदे

***** आजची वात्रटिका *****
***********************

प्रचारातील मुडदे

शब्दांनी लढायचे सोडून
शस्त्रांनी लढायला लागले.
आचारसंहितेसोबत कार्यकर्त्यांचे
मुडदे पडायला लागले.

हे उमेदवारांचे नाहीतच
हिंसेचेच प्रचार आहेत !
विरोध नाहीतर विरोधकच
संपविण्याचे विचार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 26, 2009

पक्षांतराचा खो-खो

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षांतराचा खो-खो

पक्षांतराच्या नावाखाली
राजकीय खो-खो रंगला आहे.
याचा अर्थ असा नाही,
पहिल्यापेक्षा दुसरा चांगला आहे.

लोकांनी खो-खो हसावे
असा हा पक्षांतराचा खो-खो आहे !
कुणाकुणाचा खेळ तर
’पैसा फेको तमाशा देखो’ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

बंडखोरीचा प्रचार

***** आजची वात्रटिका *****
**********************

बंडखोरीचा प्रचार

प्रचाराचे मुद्दे तरी
बघा किती मस्त् आहेत.
आपसात तुलना करू लागले
कुणात बंडखोर जास्त आहेत ?

बंडखोरीच्या दुखण्यावरती
असे उपचार योजायला लागले !
एकमेकांच्या नाकाची उंची
सगळे नकटे मोजायला लागले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 25, 2009

राजकीय फिक्सिंग

***** आजची वात्रटिका *****
***************************

राजकीय फिक्सिंग

कार्यकर्त्यांना आपसांत झुंजवुन
त्यांचे उगीच हाल केले जातात.
राजकीय साट्या-लोट्यापोटी
मतदारसंघ बहाल केले जातात.

लढवायची म्हणून लढवितात,
उमेदवार मात्र कच्चे असतात !
ज्यांच्यावरती विश्वास ठेवला
नेमके तेच तर लुच्चे असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

वैचारिक क्रांती

***** आजची वात्रटिका *****
**********************

वैचारिक क्रांती

पक्षांतर झाले म्हणजे
एका दिवसात वैचारिक क्रांती होते.
कुणाकडून तरी उभे राहिले की,
राजकारण्यांची शांती होते.

अश्या राजकीय क्रांतीकारकांची फौज
निवडणूकीला उभी ठाकली आहे !
आज त्यांचेच गुणगाण,
ज्यांच्यावरती कालपर्यंत
फक्त गरळच ओकली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटॊदा (बीड)

Thursday, September 24, 2009

गरीबीचे प्रदर्शन

***** आजची वात्रटिका *****
*********************

गरीबीचे प्रदर्शन

कुणाकडे घर नाही,
कुणाकडे गाडी नाही.
नेत्यांची गरीबी
काही थोडीथिडी नाही.

उमेदवारांच्या संपत्तीचा
असा लेखाजोखा आहे !
आपली गरीबी दाखविण्यावरच
सगळ्यांचा ठोका आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

खरेदी-विक्री

***** आजची वात्रटिका *****
*********************

खरेदी-विक्री

निवडणूक लढविणे म्हणजे
तो राजकीय कंड असतो.
उमेदवारी फुकट नाही
त्यासाठी पक्षाला फंड असतो.

’आहे रे’ असो नाहीतर ’नाही रे’
निवडणूक फंड चूकत नाही !
तरीही सगळेच म्हणतात,
आम्ही उमेदवारी विकत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 23, 2009

सत्संगाचे चंदन

***** आजची वात्रटिका *****
***********************

सत्संगाचे चंदन

सत्संगावर सत्संग
सत्संगाचे डोस आहेत.
पालथ्या घड्यावर पाणी
तरी सत्संगाचे सोस आहेत.

नवा आधार,नवा गुरु
रोज नव्याला वंदन आहे !
आपल्याच हाताने
आपल्या कपाळी चंदन आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

बंडखोरीचा बेंडबाजा

***** आजची वात्रटिका *****
*********************

बंडखोरीचा बेंडबाजा

ठसठसणारे बेंड
रसरसून फुटले आहे.
बंडखोरीचे मोहळ तर
सगळीकडेच उठले आहे.

बंडखोरी सर्वव्यापी,सर्वपक्षी,
तिने कुणालाही सोडले नाही.
एकाचेही कार्यालय दाखवा
जे कार्यकर्त्यांनी फॊडले नाही.

बेंड तर फुटलेच
पण बेंडबाजाही वाजतो आहे !
बंडखोरीच्या तापल्या तव्यावर
कुणी पोळ्याही भाजतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 22, 2009

इच्छुक ते बंडखोर

****** आजची वात्रटिका *****
**********************

इच्छुक ते बंडखोर

काल जे इच्छुक होते
ते आज बंडखोर झाले.
कोण किती निष्ठावंत ?
ते सारेच समोर आले.

निष्ठावंत आणि बंडखोरात
एका तिकीटाचा भेद आहे !
ज्याला त्याला आपल्याच
भविष्य़ाचा वेध आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 21, 2009

आंधळे प्रेम

***** आजची वात्रटिका ****
********************

आंधळे प्रेम

लोकांची ती घराणेशाही
आपली ती लोकशाही होते.
लेकरांना पुढे करण्याची
ज्याला त्याला घाई होते.

लोकशाहीच्या नावाखाली
आपल्या रक्ताला संधी असते !
ज्याच्या त्याच्या डोळ्यांवरती
पितृप्रेमाची धुंदी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

पक्षांतराचा अर्थ

***** आजची वात्रटिका *****
*********************

पक्षांतराचा अर्थ

लोकसभेला पडलेले
विधानसभेला उभे आहेत.
पक्ष आणि चिन्हांबरोबर
बदलेले सुभे आहेत.

हे तर बाजारू पक्षांतर
हे काही स्थित्यंतर नाही !
राजकीय अस्तित्वासाठी
ह्याशिवाय गत्यंतर नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीद)

Sunday, September 20, 2009

राजकीय भविष्य़

***** आजची वात्रटिका *****
*********************

राजकीय भविष्य़

निवडणूका आल्या की,
कुडमुड्यांना भाव येतो.
भविष्य़ म्हनून ठोकलेल्या
त्यांच्या पुड्यांना भाव येतो.

याला तेच,त्याला तेच
सरळ सरळ टांग असते !
अशा कुडमुड्यांच्या दारात
राजकारण्यांची रांग असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 19, 2009

आधुनिक ’पंच’ तंत्र

कायदेशिर अपमान

***** आजची वात्रटिका *****
**********************

कायदेशिर अपमान..!!


वापरायचे तेव्हढे वापरून
सामानासकट फेकून दिले.
" दलित आहे म्हणून..."
यांनीही मग ठोकून दिले.

सोयीचे नियम असे
सोयीच्या वेळी लावले गेले !
अपप्रचार करणारांचे तर
आयतेच फावले गेले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 18, 2009

राजकीय अंधश्रद्धा

***** आजची वात्रटिका *****
*********************

राजकीय अंधश्रद्धा

आचारसंहितेपेक्षाही कडक
पक्षांकडून पितृपक्ष पाळला गेला.
राजकीय चर्चेच्या नावाखाली
याद्यांचा घोळही टाळला गेला.

अंधश्रद्धेवर ठेवली तेवढी
लोकांवर श्रद्धा ठेवणार नाहीत !
खुर्ची दाखविल्याशिवाय
पिंडाला कावळेही शिवणार नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 17, 2009

धंदेवाईक बंडखोरी

***** आजची वात्रटिका *****
*********************

धंदेवाईक बंडखोरी

पक्षीय बंडखोरांमुळे
चांगलाच वांधा होतो आहे.
राजकीय बंडखोरी हा तर
मोसमी धंदा होतो आहे.

असे धंदेवाईक बंडखोर
सर्वच मतदार संघात आहेत !
बंडखोर नावाच्या विदुषकांमुळे
निवडणुकाही रंगात आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 16, 2009

अंदर की बात

***** आजची वात्रटिका *****
**********************

अंदर की बात

रात्रीच्या शिळ्या भाताला
सकाळी नवी फोडणी असते.
पक्षीय जाहिरनामे म्हणजे
निव्वळ पुड्या सोडणी असते.

सारे जाहिरनामे सारखेच
मुद्दयात खालीवरती असते !
आश्वासनांच्या लाटांअना तर
जणु उधाणाचीच भरती असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड

इकॉनॉमी फॅड

***** आजची वात्रटिका *****
*********************

इकॉनॉमी फॅड

साधी रहाणी,उच्च विचार
हे फार काळ झेपणार नाही.
काटकसरीचे सोंगही
लोकांपासून लपणार नाही.

एकाचे पाहून दुसर्‍याचे
इकॉनॉमीक फॅड आहेत !
हे गृहीत धरू नका
सामान्य माणसं मॅड आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 14, 2009

आघाड्यांचा शोध

बंडोबांची कथा

बंडोबांची कथा

***** आजची वात्रटिका *****
*********************

बंडोबांची कथा

ज्यांच्या राजकीय स्वप्नांचा
पुन्हा-पुन्हा खेळखंडोबा होतो.
त्यांच्याच पोटी जन्माला
राजकीय बंडॊबा येतो.

बंडोबांना थोपविता येईल
असे कुठलेच लिंपण नसते !
बंडोबांच्या पराक्रमाला
साधे पक्षाचेही कुंपण नसते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 12, 2009

सर्दी

राजकीय बहूरूपी

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय बहूरूपी

जातीयवाद्यांना रोखण्याचे
इरादे समजून येत नाहीत.
जात पाहिल्याशिवाय तर
कुणीच उमेदवारी देत नाहीत.

सारेच जातीयवादी
कुणी उघड,कुणी छुपे आहेत !
आतुन सारखे असले तरी
वरून वेगवेगळी रूपे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 11, 2009

बदलता दृष्टिकोन

***** आजची वात्रटिका *****
***********************

बदलता दृष्टिकोन

इकडे आले,तिकडे गेले,
यात काय मॊठे असते ?
निवडणूकांच्या तोंडावरती
असेच साटेलोटे असते.

जातो तो गद्दार,
येणाराचे हृदयपरिवर्तन होते !
एकाच्या नावाने तमाशा
दुसर्‍याचे मात्र किर्तन होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
http://suryakantdolase.blogspot.com/

पक्षांतरामागची भूमिका

***** आजची वात्रटिका *****
*********************

पक्षांतरामागची भूमिका

पक्षांतराच्या प्रक्रियेमागे
फरक फक्त लेबलाचा असतो.
खुर्चीसाठी सगळे काही
फरक फक्त टेबलाचा असतो.

दुकानाची पाटी बदलून
गिर्‍हाईकांना बनवले जाते !
ज्यांचे काल कौतुक केले
त्यांनाच आज हिणवले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 10, 2009

पाडवणूका आणि अडवणूका

***** आजची वात्रटिका *****
**********************

पाडवणूका आणि अडवणूका

निवडणूका राहिल्यात कुठे ?
त्या पाडवणूका झाल्यात.
पायात पाय घालण्यामुळे
त्यांच्या अडवणूका झाल्यात.

निवडून आणण्यापेक्षा
पाडापाडीवरच भर आहे !
गॊंड घोळायचा झाला की,
प्रत्येकाचीच तंगडी वर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

पोपट केला रे....

***** आजची वात्रटिका*****
********************

पोपट केला रे....

आघाड्या आणि युत्यांचे
पुन्हा जुनेच भारूड आहे.
कुणाचा ’पोपट’केला गेला,
कुणी स्वत:च गरूड आहे.

ज्याच्या त्याच्या ओठावरती
स्वबळाच्या पोपटपंच्या आहेत !
सावलीवरून ठरवू नका,
बुटक्यांच्या काय उंच्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 9, 2009

राजकीय प्लॅन

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय प्लॅन

आऊट्गोईंग,इनकमिंगचा
भलताच जोर आहे.
इनकमिंगचा आनंद तर
आऊट्गोईंगचा घोर आहे.

कुणाचे प्लॅन प्रिपेड,
कुणाचे प्लॅन पोस्ट्पेड आहेत !
मोबाईल कार्यकर्ते तर
सर्वत्रच रेडीमेड आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 8, 2009

दंगलखोरी

***** आजची वात्रटिका *****
*********************

दंगलखोरी

कधी धार्मिक,कधी जातीय
ठरवून थट्टा उडविल्या जातात.
दंगल काही अपघात नसतो.
दंगली तर घडविल्या जातात.

माणसं बेभान होतात,
कालचे नातेही आज तुटले जाते !
दंगल म्हणजे काय?
पिसाळलेल्या पाळीव कुत्र्यांना
स्वार्थापोटी छूss म्हटले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दंगल में मंगल

***** आजची वात्रटिका *****
*********************

दंगल में मंगल


सारा हैदोस श्वापदांचा
वाटते हे तर जंगल आहे.
इरादे एवढे रानटी की,
दंगल में मंगल आहे.

कधी हा वणवा मिरजेत,
कधी तो सांगलीत असतो !
त्यांचा राजकीय स्वार्थ तर
धगधगत्या दंगलीत असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 7, 2009

मठीय राजकारण

***** आजची वात्रटिका *****
*********************

मठीय राजकारण

गटा-तटाचे राजकारण
आता मठामठात घुसू लागले.
भगव्या फेट्यावालेही
पांढर्‍या गोटात दिसू लागले.

भक्तांची वेडी भक्ती
उगीच गृहीत धरू नका !
भक्तांच्या भक्तीचाही
असा काळाबाजार करू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

चीनचा नकटेपणा

चीनचा नकटेपणा

पाकड्यानंतर लाल माकडांची
घुसखोरीची चाल आहे.
खडकाखडकावर लिहून टाकले,
आपलीच कशी ’लाल’ आहे.

अंतर्गत असंतोषामुळे
चीनची खडकाला धडक आहे !
असंतोषाचा रंग कुठे हिरवा,
तर कुठे लालभडक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सूर्यकांती:सूर्यकांत डोळसे यांचा वात्रटिका आणि कवितांचा एक बहारदार कार्यक्रम...जाहिरात

Sunday, September 6, 2009

ऐतिहासिक प्रसंग

***** आजची वात्रटिका *****
*********************

ऐतिहासिक प्रसंग

भावना कशाने दुखावतील?
हे काही सांगता येत नाही.
खरा इतिहासही मग
खुले आम टांगता येत नाही.

इतिहास बदलता येत नाही
आपणच बद्लून घ्यायला हवे !
जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन
इतिहासाकडे पहायला हवे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 5, 2009

विद्यार्थ्यांची विनंती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विद्यार्थ्यांची विनंती

आम्ही असे म्हणत नाही,
तुम्ही खाऊ-पिऊ नका.
आम्ही असेही म्हणत नाही,
तुम्ही राजकारणी होऊ नका.

काळाप्रमाणे बदलावेच लागते
आम्ही हे जाणतो आहोत.
छाटले जरी आमचे आंगठे,
तुम्हांला आदर्श मानतो आहोत.

आदर्श आहात,आदर्श रहा,
पुरस्कारांसाठी भांडू नका.
काखेत कळसा असताना
गावात वळसा देत हिंडू नका.

आम्ही काय बोलतो ?
याची आम्हांला सुध-बुध आहे !
रतीब कुणीही घालो,
शेवटी हे वाघिणीचे दुध आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-1981
दैनिक पुण्यनगरी
5सप्टेंबर 2009

Friday, September 4, 2009

गणपतीचा निरोप

***** आजची वात्रटिका *****
*********************

गणपतीचा निरोप

गणपती आले
गणपती गेले.
गणपतीपेक्षा उंदीरच
जास्त बे-चैन झाले.

उंदीर नाचले होते,
उंदीर पेलेही होते !
ते शुद्धीवर आले तेंव्हा
गणपती गेलेही होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 3, 2009

राजकीय प्रवास

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय प्रवास

उमेदवारी मिळविण्यासाठी
वाट्टेल ते मार्ग योजावे लागतात.
एकदा तिकीट म्हटले की,
त्याला पैसेच मोजावे लागतात.

जसा गाडीचा दर्जा असेल,
तसाच तिकीटाचा भाव आहे !
जनता एक्सप्रेसच ठरविते,
कुणाची कुठपर्यंत धाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

जाहिरनाम्यांचा नकलीपणा

***** आजची वात्रटिका *****
**********************


जाहिरनाम्यांचा नकलीपणा

जाहिरनामे म्हणजे
सगळे छु मंतर असते.
जाहिरनामे कधीचेही काढा
त्यात फारसे अंतर नसते.

कधी यांचे ,कधी त्यांचे
कलमंही छापले जातात !
एकमेकांचे राजकीय दृष्टीकोनही
नकळत ढापले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 2, 2009

अपशकूनी चेहरे

***** आजची वात्रटिका *****
**********************

अपशकूनी चेहरे

आचारसंहितेच्या बडग्यापुढे
सगळे झकत झुकले जातात.
डिजिटलवरचे नकोसे चेहरे
काही दिवस तरी झाकले जातात.

आचारसंहिता कायमची पाहिजे
तसे वठणीवर यायचे नाहीत !
अपशकूनी चेहरे हटवले की,
कुणाला अपशकून व्हायचे नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 1, 2009

आचारसंहिता

***** आजची वात्रटिका *****
**********************

आचारसंहिता

तुझ्या थापाबाजीची शिक्षा
मी चांगलीच भोगली आहे.
आश्वासनं बंद कर
आचारसंहिता लागली आहे.

तो एवढा थापाड्या असूनही
पुढे काहीच बोलला नाही !
तिच्या आचारसंहितेपुढे
त्याचा विलाज चालला नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका24एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -322 वा

दैनिक वात्रटिका 24एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -322 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Lj6fYs7HXzulsl3-eEaC...