Sunday, February 28, 2010

वैज्ञानिक दृष्टीकोन

|| राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||


***** आजची वात्रटिका *****
**********************

वैज्ञानिक दृष्टीकोन

विज्ञान शिकता शिकता
विज्ञान जगता आले पाहिजे.
डोळे,उघडून,मेंदू वापरून,
सर्वांना बघता आले पाहिजे.

विज्ञान जगणे म्हणजे,
खरे विज्ञान शिकणे होय !
सुशिक्षित दांभिकांना
जिथल्या तिथे रोखणे होय !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, February 26, 2010

चिरंजीव मराठी

***** आजची वात्रटिका *****
**********************

चिरंजीव मराठी

मराठी वाचवा,मराठी वाचवा
ह्या केवळ गप्पा आहेत.
घरोघरी मम्मी,आन्टी,
अंकल आणि पप्पा आहेत.

कुणी इंग्रजाळलेले तर
कुणी हिंदाळलेले आहेत.
मराठीचे सारे संस्कार
माळ्यावरती गुंडाळलेले आहेत.

अशांनी मराठी वाचवा म्हणायचे
काहीसुद्धा कारण नाही !
ज्ञाना,नामा,तुका,एका
जिचे पुत्र,
तिला कधीसुद्धा मरण नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, February 24, 2010

ममता बजेट

***** आजची वात्रटिका *****
**********************

ममता बजेट

वर वर तरी वाटतेय
महाराष्ट्रासाठी बेस्ट आहे.
रेल्वेचे बजेट मात्र
बंगालसाठी ’वेस्ट’ आहे.

बजेट कुणाचेही असो,
त्यात एकच समता असते !
आपापल्या राज्याची
रेल्वेमंत्र्याला ममता असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

बजेटचा ताळमेळ



आजची वात्रटिका *
**** ********************** 

 बजेटचा ताळमेळ 
 \गृहमंत्र्यांकडून अर्थमंत्र्यांना 
अगदी सहज फसवले जाते. 
नवर्‍याच्या बजेटचे बुड 
बायकोकडून बसवले जाते. 

 गृहमंत्र्याचे पराक्रम 
अर्थमंत्र्यांना कळत नाहीत ! 
आले किती? गेले किती? 
ताळमेळही जुळत नाहीत !! 

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, February 22, 2010

प्रश्नपत्रिकेचे मनोगत

***** आजची वात्रटिका ******
**********************

प्रश्नपत्रिकेचे मनोगत

एक प्रश्नपत्रिका
परीक्षेअगोदर फुटली.
झेरॉक्स सेंटरमध्ये
मला राजरोस भेटली.

मी तिला म्हणाली,
बाई,हे चांगले काम नाही !
त्यावर ती उत्तरली,
सामूहिक बलात्कार झाल्यावर
अब्रु राखण्यात राम नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) .

Sunday, February 21, 2010

पेताड प्रबोधन

***** आजची वात्रटिका ******
**********************

पेताड प्रबोधन

वैचारीकतेचा दुष्काळ,
मनोभूमिकाही रेताड असतात.
ज्यांना प्रबोधनाला बोलवावे,
ते वक्तेही पेताड असतात.

लोक विचाराबरोबरच
आचाराचेही भोक्ते असतात !
विचारांनी झिंगवायचे तर
झिंगलेले वक्ते असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) .

Saturday, February 20, 2010

प्रायव्हेट लिमिटेड

***** आजची वात्रटिका *****
**********************

प्रायव्हेट लिमिटेड

राष्ट्रपुरूषांची व्यापकता
कावेबाजपणे रोकली जाते.
जात,धर्म,पंथाची चौकट
त्यांच्याभोवती ठोकली जाते.

राष्ट्रपुरूषांच्या कार्याचा असा
गैरफायदा घेऊन जातात !
राष्ट्रपुरूषांसारखे राष्ट्रपुरूष
मर्यादित होऊन जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, February 18, 2010

खूनी आत्महत्या

***** आजची वात्रटिका *****
**********************

खूनी आत्महत्या

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
ह्या आत्महत्या आहेत,
आम्ही मानायला तयार नाही.
तुम्हांस म्हणायचे तर म्हणा
आम्ही म्हणायला तयार नाही.

या आत्महत्यांमागचे
वेगळेच कटू सत्य आहे.
ते सारे खून आहेत
हेच यातले तथ्य आहे.

लेकरांना कळू देत नाहीत
आपण किती गुणी आहोत ?
आपण सगळे मिळून
त्या निष्पापांचे खुनी आहोत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, February 16, 2010

घरगुती आर.डी.एक्स.

***** आजची वात्रटिका *****
**********************

घरगुती आर.डी.एक्स.

घराघरात बायको नावाचे
घरगुती आर.डी.एक्स.असते.
त्याचा कधीतरी स्फोट होणारच
हेही अगदी फिक्स असते.

अधून मधून फुटले तरी
त्याचा आवाज मात्र होत नाही !
ज्याची त्याला बसते झळ,
इतरांच्या लक्षातही येत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, February 15, 2010

बेभान

***** आजची वात्रटिका *****
**********************

बेभान

दिल्ली असो नाही तर गल्ली
राजकारणात भेदभाव नसतात.
गल्लीला दिल्लीचे,
दिल्लीला गल्लीचे वेध असतात.

खालचे वर सरकतात,
वरचे खाली घसरले जातात !
राजकीय नशा चढली की,
आपले स्तरही विसरले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, February 14, 2010

राधा,कृष्ण आणि व्हॅलेंटाईन डॆ

***** आजची वात्रटिका *****
**********************

राधा,कृष्ण आणि व्हॅलेंटाईन डॆ

राधा म्हणाली कृष्णाला,
कान्हा तुझे माझे नाते काय़?
किती व्हॅलेंटाईन डे आले गेले
तुला सांगायला होते काय ?

तेंव्हा कृष्ण उत्तरला,
राधे तु म्हणजे मी;
मी म्हणजे तु.
त्याचा एव्हढा गवगवा कशाला ?
तुझ्या माझ्या प्रेमाला
व्हॅलेंटाईन डॆ हवा कशाला ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, February 13, 2010

२६/११ ते १३/२

***** आजची वात्रटिका *****
**********************

२६/११ ते १३/२

जेंव्हा आपल्या डोळ्यावर
राजकीय धुंदी असते
अतिरेकी कारवायांना
हीच खरी संधी असते.

२६/११ व १३/२ मध्ये
हेच तर साम्य आहे !
जरी १३/२ हा
२६/११ पेक्षा सौम्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

विकृत लढाई

***** आजची वात्रटिका *****
**********************

विकृत लढाई

मारामारी,फोडाफोडी,
दगडंही हाणायला लागले.
माजवलेल्या दहशतीला
आंदोलने म्हणायला लागले.

आंदोलनांच्या नावावरती
सरळ सरळ गुंडागर्दी आहे !
लोकशाहीच्या कानी-कपाळी
ठोकशाहीची वर्दी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, February 12, 2010

असून अडचण नसून खोळंबा

***** आजची वात्रटिका *****
**********************

असून अडचण नसून खोळंबा

शौचालये बांधून बांधून
पाणंदमुक्ती साधली जाते.
जिथे तांब्यावर भागायचे
तिथे आता बादली जाते.

आरोग्यदायी योजनेला
नाही तरी म्हणायचे कसे?
जिथे प्यायलाच मिळत नाही
तिथे धुवायला आणायचे कसे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, February 11, 2010

फिल्मी तमाशा

***** आजची वात्रटिका *****
**********************

फिल्मी तमाशा

आज बंद होईल,
उद्या बंद होईल,
लोकांना वेडी आशा आहे.
चित्रपटांच्या वादावरून
रोज नवा तमाशा आहे.

काहीही असो,कसेही असो,
लोकांसाठी हे जुल्मी आहे !
कुठेतरी मनात येऊन जाते
हा तमाशाही फिल्मी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, February 9, 2010

गुगली ते बाऊंसर

***** आजची वात्रटिका *****
**********************

गुगली ते बाऊंसर

दोन्ही काकांचे भेटणे
जरा अडचणीचे ठरू लागले.
समांतर सत्ताकेंद्र नाही
मानायला लोक का-कू करू लागले.

खेळातले राजकारण संपले,
राजकारणात खेळ रंगला आहे !
परस्परांवरचा विश्वास
नकळपणे भंगला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, February 8, 2010

मुखपत्र ते मूर्खपत्र

***** आजची वात्रटिका *****
**********************

मुखपत्र ते मूर्खपत्र

विरोधकांच्या टिंगलटवाळीने
मुखपत्र व्यापले जाते.
तोंडाला येईल ते
मुखपत्रात छापले जाते.

तोंडघशी पडले जाईल
असेही काही येऊन जाते !
मुखपत्रासारखे मुखपत्रही
मूर्खपत्र होऊन जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, February 7, 2010

पद्मचे ’कवि’त्त्व

***** आजची वात्रटिका *****
**********************

पद्मचे ’कवि’त्त्व

एकाचे पाहून दुसर्‍य़ाच्या
अंगात यायला लागले.
पद्म पुरस्कारांचे कवित्त्व
रंगात यायला लागले.

मराठी कविंना उगीचच
टिकेची सुरसुरी आहे !
तरी बरे म्हणावे लागेल
अजून बाजारात तुरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

पद्मचे ’कवि’त्त्व

***** आजची वात्रटिका *****
**********************

पद्मचे ’कवि’त्त्व

एकाचे पाहून दुसर्‍य़ाच्या
अंगात यायला लागले.
पद्म पुरस्कारांचे कवित्त्व
रंगात यायला लागले.

मराठी कविंना उगीचच
टिकेची सुरसुरी आहे !
तरी बरे म्हणावे लागेल
अजून बाजारात तुरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

विकासाची तक्रार

***** आजची वात्रटिका *****
**********************

विकासाची तक्रार

विकास म्हणाला योजनेला,
तुझे कसे झकास आहे.
तुझी वाढ होत राहिली
मी मात्र भकास आहे.

तुझा माझा अनैतिक संबंध
आजकाल सर्वज्ञात आहे !
तुझी बाळंतपणं होतात,
माझा मात्र गर्भपात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, February 5, 2010

निष्ठा दर्शनाची ’चपला’ई

***** आजची वात्रटिका *****
*********************

निष्ठा दर्शनाची ’चपला’ई

जोडे उचला,जोडे पुसा,
निष्ठादर्शन करीत बसा.
पाहिजे तर नेतृत्त्वाच्या घरी
पाणीसुद्धा भरीत बसा.

निष्ठा दाखवावीच लागते
ही गोष्ट जरी खरी असते !
जुने जाणते सांगुन गेलेत,
पायाची वहाण,
पायातच बरी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, February 2, 2010

रोख ’ठोक’ उपाय

***** आजची वात्रटिका *****
*********************

रोख ’ठोक’ उपाय

देणारा देत आहे
घेणारा घेत आहे.
भ्रष्टाचाराच्या पायावर
सच्चाईचे प्रेत आहे.

घेणारांना घेऊ द्या,
देणारांनी रोकले पाहिजे !
घेण्यासाठी सोकलेल्यांना
मागताक्षणी ठोकले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मराठीचे राजकारण

***** आजची वात्रटिका *****
*********************

मराठीचे राजकारण

आपापल्या सोईने
वापरतात मराठी.
जशी पाहिजे तशी
ढोपरतात मराठी.

मऊ मऊ लागताच
कोपरतात मराठी.
खरे बोलले की,
जोपरतात मराठी.

डोक्यात किडे त्यांच्या
टोकरतात मराठी !
काढण्या जुने मढे
उकरतात मराठी !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, February 1, 2010

राष्ट्रीय पुरस्कार

***** आजची वात्रटिका *****
**********************

राष्ट्रीय पुरस्कार

पायचाटू,लाळघोटूंच्या
पुरस्कार वाट्याला येवू नयेत.
पुरस्कारांची प्रतिष्ठा जपण्यासाठी
पुरस्कार नट-नट्याला देवू नयेत.

कर बुडवे,राजकीय भडवे
यांना पुरस्कार देता कामा नये !
ऊठसूट पुरस्कारांचे
अवमूल्यन होता कामा नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

daily vatratika...19march2024