Friday, April 30, 2010

पन्नाशीतील अपेक्षा

***** आजची वात्रटिका ******
**********************

पन्नाशीतील अपेक्षा

केले त्याचा अभिमान,
राहिले त्याचे शल्य पाहिजे.
भरभराट होतच राहिल
मात्र ती समतुल्य पाहिजे.

राजकीय इच्छाशक्तीची
पावलोपावली भेट व्हावी !
सह्याद्रीची झेप बघून
हिमालयाची मान ताठ व्हावी !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Thursday, April 29, 2010

खादाड खाऊंनो....

***** आजची वात्रटिका ******
**********************

खादाड खाऊंनो....

खादाड खाऊंनो लक्षात ठेवा
खाल्लेले ओकावेच लागते.
लोकांच्या तळतळाटाला
व्याजासह चुकावेच लागते.

सगळे खादाड खाऊ जमले की,
मिळेल तेवढे गोड वाटते.
फुकट काम करायला
सगळ्यांनाच जड वाटते.

तोर्यंतच तुम्ही साव असता,
जोपर्यंत पकडले जात नाहीत !
याचा अर्थ असा नाही,
तुम्ही कधीच काही खात नाहीत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Wednesday, April 28, 2010

जातीय तक्रार

***** आजची वात्रटिका ******
**********************

जातीय तक्रार

माझा फायदा घेताना
कुणी-कुणी लाजत नाहीत.
जनगणना करताना
मला मात्र मोजत नाहीत.

जनात आणि मनातही
मला पाळले जात आहे !
माझा बागुलबुवा दाखवून
सोयीस्कर टाळले जात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Tuesday, April 27, 2010

फोन टॅपिंग

***** आजची वात्रटिका ******
**********************

फोन टॅपिंग

नवरा-बायकोने एकमेकांचे
फोन कॉल टॅप केले.
दोघांनाही पश्चाताप झाला
आपण कुठून हे पाप केले?

डोळ्यात आणि कानात
चार बोटांचा गॅप असतो !
विकृत मनोवृत्तीला
संशयाचा शाप असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Monday, April 26, 2010

आयपीएल घोटाळा

***** आजची वात्रटिका ******
**********************

आयपीएल घोटाळा

खेळात मनोरंजन घातले की,
त्याचा बरोबर सेल होतो.
खेळात राजकारण घुसले की,
त्याचा आयपीएल होतो.

राजकीय भेसळ किती असावी?
यालाही ठराविक माप आहे !
आयपीएल घोटाळा साधा नाही
तो तर बोफोर्सचा बाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

ऍड-मॅड-पणा

***** आजची वात्रटिका ******
**********************

ऍड-मॅड-पणा

एका आठवड्यातच
तुम्ही वजन घटवू शकता.
गोरेपणाची मोहरही
कागदावर उठवू शकता.

जाहिरातींच्या देखणेपणामुळे
सभ्य नजराही चळू शकतात.
एखाद्या सेंटमुळे
पोरीही मागे पळू शकतात.

काही दिवसातच
टक्कल गायब होऊ शकते !
असल्या जाहिराती बघूनच
अक्कल गायब होऊ शकते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Sunday, April 25, 2010

आयपीएल घोटाळा

***** आजची वात्रटिका ******
**********************

आयपीएल घोटाळा

खेळात मनोरंजन घातले की,
त्याचा बरोबर सेल होतो.
खेळात राजकारण घुसले की,
त्याचा आयपीएल होतो.

राजकीय भेसळ किती असावी?
यालाही ठराविक माप आहे !
आयपीएल घोटाळा साधा नाही
तो तर बोफोर्सचा बाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Saturday, April 24, 2010

लंगोटी यार

***** आजची वात्रटिका ******
**********************

लंगोटी यार

आपले कसले लंगोटी यार?
ऐकणारांना तरी पटले पाहिजे.
नट्यांच्याच मित्रांनाच
खरे ’लंगोटी यार’ म्हटले पाहिजे.

तोलून मापूनच बोलावे
शब्दांचे अर्थ फार असतात !
जे लंगोट्या घालतात
त्यांनाच लंगोटी यार असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Friday, April 23, 2010

आयपीएल करमणूक

***** आजची वात्रटिका ******
**********************

आयपीएल करमणूक

आयपीएलची एक-एक बातमी
जसजशी बाहेर येऊ लागली.
तसतशी लोकांची
आयती करमणूक होऊ लागली.

आवश्यकता नाही की,
त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे !
आता तरी आयपीएल वर
करमणूक कर लावला पाहिजे !!
.
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Tuesday, April 20, 2010

क्रिकेट लालित्य

***** आजची वात्रटिका ******
**********************

क्रिकेट लालित्य

ओव्हरपासून बॅटपर्यंत
सगळेच आखूड होऊ लागले.
चिअर्स गर्ल्सचे कपडेही
तसाच प्रतिसाद देऊ लागले.

क्रिकेट नुसता खेळच नाही
तो तर ’ललित’ कला आहे !
काळ्याचे पांढरे करण्याचा
अगदी सोपा मार्ग झाला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Monday, April 19, 2010

सुधारीत वेळापत्रक

***** आजची वात्रटिका ******
**********************

सुधारीत वेळापत्रक

चार दिवस उजेडाचे
चार दिवस अंधाराचे असावेत.
लोडशेडेंगचे नियम
फक्त तासा-तासात नसावेत.

एकदा दिवसावर आले की,
वाटच बघायची गरज नाही !
अंधाराच्या राज्यात
उजेड मागायची गरज नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Sunday, April 18, 2010

अधिक मास

***** आजची वात्रटिका ******
**********************

अधिक मास

जावयां‍ची होते चांदी
तसा सतत वरती गोंडा असतो.
अधिकाचा मास म्हणजे
सासर्‍य़ाच्या पायावर धोंडा असतो.

सासुरवाडीसाठी तर
हा दुष्काळात तेरावा होऊन जातो !
जावाई नावाचा दहावा ग्रह
अधिकाचा बोनस घेऊन जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Friday, April 16, 2010

ओवी ते शिवी

***** आजची वात्रटिका ******
**********************

ओवी ते शिवी

बोलतात एक, करतात एक
संयुक्तिक वर्तन होत नाही.
आता हे समजून घ्यावे,
दुस‍र्‍यास शिव्या देऊन
कधी परीवर्तन होत नाही.

शिव्याही ओव्या होतात
त्यात विद्वेषता नसली पाहिजे !
नैतिक उंची दिखावू नको
ती तर अगदी असली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Thursday, April 15, 2010

निळे कोल्हे

***** आजची वात्रटिका ******
**********************

निळे कोल्हे

भ्रमाचे भोपळे फुटत गेले
झाले ते ऐक्य फसवे निघाले.
दोष कोणाला देत बसावे?
सारेच बाजारबसवे निघाले.

त्यांनाच खरीदले जाते
जे विकायला तयार आहेत !
नव नवे नामांतर करून
धूळ फेकायला तयार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Wednesday, April 14, 2010

बाबा....

***** आजची वात्रटिका ******
**********************

बाबा....

तुमची माफी मागावी
एवढी कुठे लायकी आहे ?
खंडीभर नेते असताना
चळवळ निर्नायकी आहे.

ऐक्याच्या कडबोळ्याला
एकीचे नाव आहे.
दहा दिशांना दहा तोंडे
हा मोसमी डाव आहे.

नेतृत्त्वाचा नको धांडोळा,
जनतेने मनावर घ्यावे लागेल !
शेवटी हेच खरे आहे
अत्त दिप व्हावे लागेल !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Tuesday, April 13, 2010

वर्गणीची पोच-पावती

***** आजची वात्रटिका ******
**********************

वर्गणीची पोच-पावती

उत्सवांपासून सामाजिकतेची
कडी तिथेच निखळली जाते.
जेंव्हा वर्गणीच्या नावावर
सरळ खंडणी उकळली जाते.

वैचारिक उथळतेला
असा खळखळाट असतो !
उत्सवांच्या भव्य-दिव्यतेमागे
शोषितांचा तळतळाट असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Monday, April 12, 2010

गालबोट

***** आजची वात्रटिका ******
**********************

गालबोट

मतदानाच्या दिवशी
बोगसवाल्यांचे फावले जाते.
लोकशाहीच्या गालाला
राजरोस बोट लावले जाते.

जो बोगस करील त्याला
पाहिजे तो माल असतो !
जणू कुणालाही बोट लावण्यासाठीच
लोकशाहीचा गाल असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Saturday, April 10, 2010

लोकशाही दर्शन

***** आजची वात्रटिका ******
**********************

लोकशाही दर्शन

संसारिक लोकशाही
वर वर अगदी साधी असते.
नवरा हूकुमशहा असेल तर
बायको नक्की नक्षलवादी असते.

सशस्त्र क्रांती करण्यावरच
बायकोचा नेहमी भर असतो.
आपली तीच पूर्वदिशा
नवरा म्हणजे तर वर असतो.

स्वंयपाक घरातील वस्तु
जेंव्हा शस्त्र-अस्त्र होऊ लागतात !
तेंव्हा बायकोचे डबडबते डॊळे
हिटलरला दर्शन देऊ लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

धार्मिक ’गड’ बड

***** आजची वात्रटिका ******
**********************

धार्मिक ’गड’ बड

धर्माला राजकारणाची,
राजकारणाला धर्माची ओढ आहे.
नेत्या-नेत्याच्या तावडीत
कोणता ना कोणता गड आहे.

तिर्थक्षेत्राच्या साक्षीने
ज्याची त्याची खडबड आहे.
नेत्याच्या नावाने
गड ओळखला जावा
ही तरी खरी ’गड’ बड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Friday, April 9, 2010

दहशतवादी तंत्र

***** आजची वात्रटिका ******
**********************

दहशतवादी तंत्र

आपले आणि परके
दहशतवाद काही पाळीत नसतो.
दया-मायेचा प्रश्न तर
दहशतवाद्यांच्या टोळीत नसतो.

आपल्या अस्त्तित्त्वासाठी
ते काहीही करू शकतात !
परक्यांनाच काय पण
आपल्यांनासुद्धा मारू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Thursday, April 8, 2010

रेड सिग्नल

***** आजची वात्रटिका ******
**********************

रेड सिग्नल

हिंसा कुणालाच मान्य नाही
नक्षलवादी तीच करीत आहेत.
इथल्या व्यवस्थेतील शुक्राचार्य
नक्षलवादाची बीजं तर
मनामनात पेरीत आहे्त.

नक्षलींच्या अमानुषतेचा
निषेध तर व्हायलाच पाहिजे !
हा रक्तरंजित इशाराही
व्यवस्थेने लक्षात घ्यायलाच पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

ज्याची त्याची ’खबर’ दारी

***** आजची वात्रटिका ******
**********************

ज्याची त्याची ’खबर’ दारी

जिला ओळखतच नव्हता
तिलाच आता तलाक आहे.
सानियाच्याही लक्षात यावे,
शोएब किती चलाख आहे ?

शोएबने तर सोडलीच
पण मिडियाने मात्र सोडू नये !
उताविळपणाचा अध्याय
असा पुन्हा पुन्हा घडू नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Wednesday, April 7, 2010

मद्यार्काचे नवे स्रोत

***** आजची वात्रटिका ******
************************

मद्यार्काचे नवे स्रोत

दारूचा नवा साठा
करवंदाच्या जाळीत असेल.
करवंदांच्या जाळी-जाळीत
कुणी दारू गाळीत असेल.

डोंगरी मैनेच्या स्वागताला
अंगूर की बेटी आतूर आहे !
जांभूळ पिकल्या झाडाखाली
चिक्कूही काजूला फितूर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Tuesday, April 6, 2010

आमचा लेखाजोखा

***** आजची वात्रटिका ******
************************

आमचा लेखाजोखा

नकारार्थी मुंढी हलविली तरी
सुधीर मानगुटीवर बसले.
गड सुरक्षीत करणार नाहीत,
ते तर गडकरी कसले ?

नाथासारखा नाथही
हळूच बेदखल केला जातो आहे !
कमळ फुलवायच्या नावाखाली
गटबाजीचा चिखल केला जातो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

राजकीय आदर्श

***** आजची वात्रटिका ******
**********************

राजकीय आदर्श

विद्यार्थ्यांनो आणि शेतकर्‍यांनो,
हे तुमच्या लक्षात आलेय का ?
राजकारण्यांनी आत्महत्या केल्यात
असे कधीतरी झालेय का ?

लढाऊ वृत्ती आणि चिवटपणा
तुम्ही लक्ष देण्यासारखा आहे !
राजकारण्यांचा हा आदर्श
खरोखरच घेण्यासारखा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, April 5, 2010

नामनिर्देश

***** आजची वात्रटिका ******
**********************

नामनिर्देश

ज्याला त्याला जाती-धर्माची
उगीचच मस्ती आहे.
वस्तीचे नावच सांगते,
इथे कुणाची वस्ती आहे ?

अस्मितेच्या नावावरती
हा समाजविघातक डाव आहे !
विशिष्ट वस्तीला
विशिष्ट राष्ट्र्पुरूषाचे नाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, April 4, 2010

राजकीय भिंत

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय भिंत

सैनिकां-सैनिकांत
नवी भिंत उभी राहू लागली.
सामान्य जनता तर
आश्चर्याने पाहू लागली.

नवनिर्माण नको म्हणणार्‍यावर
रोखलेले बाण आहेत !
कुणी काही बोलावे तर
भिंतीला देखील कान आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, April 3, 2010

काव्यात्मक न्याय

***** आजची वात्रटिका *****
**********************

काव्यात्मक न्याय

कवीची बायको कवीला म्हणाली,
शब्दाला शब्द जोडीत चला.
कशा का होईना पण
कविता मात्र पाडीत चला.

कवितांमुळे साहित्यात
जरी भर पडणार नाही !
लाईट बील थकले तर
कुणी कनेक्शन तोडणार नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सानियाच्या लग्नाची गोष्ट

***** आजची वात्रटिका *****
**********************

सानियाच्या लग्नाची गोष्ट

सानिया मिर्झाचे लग्न म्हणजे
धक्क्यांची मालिका बनते आहे.
लवकरच ती म्हणे
शोएबची मलिका बनते आहे.

सानियाने कुणाकडून खेळावे ?
वेगवेगळी उत्तरे मिळत आहेत !
दोघे मात्र परस्परांशी
चक्क डबलगेम खेळत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, April 2, 2010

शैक्षणिक हक्क

***** आजची वात्रटिका *****
**********************

शैक्षणिक हक्क

शिक्षणाचा खरा हक्क
विद्यार्थ्यांना कळला पाहिजे.
किमान वर्गाला एक
शिक्षक तरी मिळला पाहिजे.

शिक्षक शिक्षकच असावा
तो शिक्षण सेवक नको.
शिकवायला तरी वेळ द्या,
टपालाची आवक-जावक नको.

शिक्षणाच्या हक्काचे नाते
कर्तव्याशीही जोडले पाहिजे !
राजकारणाला शिक्षणापासून
मूळापासून तोडले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, April 1, 2010

मूर्खपणाचा कळस

***** आजची वात्रटिका *****
**********************

मूर्खपणाचा कळस

सारेच मुर्ख इथे
कुणी्च शहाणे नाही.
हा वारसा मेंढरांचा
तपासून पहाणे नाही.

आपल्या मूर्खपणाची
कुणाला इथे चाड आहे ?
मेंढरांच्या कळपामध्ये
नकली लांडग्यांची वाढ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...