Sunday, July 31, 2011

संशोधनाचा भाग

पुढून झाले, मागून झाले
दोन्हीकडूनही वार झाले.
बोलता बोलता सगळीकडे
इतिहास संशोधक फार झाले.

उंदरांच्या सुळसुळाटाला
मांजराचीच साक्ष आहे!
बोलघेवडय़ांच्या आगलावेपणात
खरा इतिहास भक्ष्य आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, July 30, 2011

गटारी : एक निमित्त

खाण्या-पिण्याची आवड तर
अगदी निसर्गदत्त असते
आधीच पेताड,
त्यात गटारीचे निमित्त असते.

जणू श्रावणाच्या स्वागतालाच
काही तास ठेवले जातात!
गटारीचा फायदा घेऊन
आणखी दिवे लावले जातात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Friday, July 29, 2011

श्रद्धेचा गर्भपात

लोकश्रद्धेचा बळी

निवडणूक जिंकता आली की,
त्याचा लोकप्रतिनिधी होतो.
जरी लोकशाही मार्गाचा
निवडणुकीत अंत्यविधी होतो.

मग लोकशाहीचे दिवसच काय?
चक्क पाच वर्ष घातले जातात!
लोकश्रद्धेचा बळी घेऊन
लोकांनाच ऊतले जातात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, July 28, 2011

प्रगतीचे लक्षण

शिक्षणाची गटारगंगा
धो-धो वाहू लागली
गल्ली-बोळामधून
शाळा-कॉलेजेस् होऊ लागली

ज्ञानदानासाठी नाहीतर
अनुदानासाठी शिक्षण आहे!
गावोगावच्या शिक्षण संस्था म्हणजे
कार्यकर्त्यांच्या प्रगतीचे लक्षण आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, July 27, 2011

दुबार पेरणी

मातीमध्ये पुरूनसुद्धा
काही शिल्लक उरावे लागते.
आभाळमाया आटली की,
पुन्हा एकदा पेरावे लागते.

कधी अस्मानाची,
कधी सुलतानाची करणी असते.
कधी वांझोटय़ा बियाणांमुळे
दुबाराची पेरणी असते.

दुबार काय, तिबार पेरा
दुर्दैवाचा फास सुटला पाहिजे!
पिकाच्या दाण्यादाण्यातून
आता सुरुंग फुटला पाहिजे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, July 26, 2011

भ्रष्टाचाराचा तळतळाट

तोच खरा सुखी माणूस
जो काबाड कष्ट करतो.
हरामाचा पैसा
माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो.

हे सत्य जेवढे कडू
तेवढेच साधेसुधे आहे!
याचे ढळढळीत उदाहरण
तिहारच्या जेलमध्ये आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, July 25, 2011

नकारात्मक परंपरा

सत्ताधारी आणि विरोधकांकडून
लोकशाही धोरण पाळले जाते.
चहापानाचे सरकारी आमंत्रण
विरोधकांकडून टाळले जाते.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच
नकारघंटा वाजली जाते!
नकाराची घातक परंपरा
अधिवेशनागणिक रूजली जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Thursday, July 21, 2011

मुंबई स्पिरीट

कितीही संकटं येवोत
मुंबई लगेच रुळावर येते.
मुंबईचे हे स्पिरीटच
मुंबईच्या मुळावर येते.

ज्याला आपण स्पिरीट म्हणतो
ती तर मुंबईची मजबुरी आहे!
तिला भिऊन कसे चालेल?
जीच्या गळ्यावर रोजच सुरी आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, July 20, 2011

देशी-विदेशीचा कैफ

'अर्धे देशी, अर्धे विदेशी
राहुलचे लाईफ आहे.'
कॅटरीनाच्या या विधानाने
विरोधकांना कैफ आहे.

जुन्याच बंदुकीसाठी
आता कॅटरीनाचा खांदा आहे!
या मुद्याला जनता इटली तरी
जुने भांडवल, जुनाच धंदा आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, July 19, 2011

चुकांचा अतिरेक

अतिरेक्यांच्या हल्ल्यापासून
आम्ही काहीही शिकलो नाहीत.
चुकानंतर घोडचुका
करण्यास मात्र चुकलो नाहीत.

अतिरेक्यांच्या अतिरेकाप्रमाणे
आमचाही हा अतिरेक आहे!
बॉम्बस्फोटांच्या निमित्ताने
एकमेकास जाहीर चेक आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, July 18, 2011

गृहयुद्ध

बॉम्बस्फोटांचे दु:ख
ज्यांनी भोगायचे ते भोगले आहे.
आबाs बाबाssम्हणावे असे
सरकारी 'गृह'युद्ध लागले आहे.

गृहयुद्धाला चालना देणे
हेही अतिरेक्यांचे एक ध्येय आहे!
पेटलेल्या गृहयुद्धाचे
अतिरेक्यांनाच श्रेय आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Wednesday, July 13, 2011

केंद्रीय फेरबदल

हातातले पत्तेच
पुन्हा पुन्हा पिसले गेले.
तेच तेच चेहरे
नव्या जागी दिसले गेले.

मर्यादित पर्यायांमुळे
सगळीच आणीबाणी आहे!
चौकटीतल्या राजावर
हुकूमाची राणी आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Tuesday, July 12, 2011

उपवासाची व्याख्या

उपवासाचे पुण्य म्हणे
भरल्यापोटी भेटले जाते
केवळ अन्नातल्या बदलालाच
उपवास म्हटले जाते

ज्यांना पोटभर खायला मिळते
तेच उपवास धरू शकतात!
उपवासाच्या प्रचलित व्याख्येचा
तेच फेरविचार करू शकतात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Monday, July 11, 2011

दरोडय़ाचे सत्र

कुणी दिवसा घालतो आहे
कुणी रात्री घालतो आहे
कायद्यासारख्या कायद्यालाही
बिनधास्त कोलतो आहे

आमचे कोण काय करू शकतो?
त्यांचे जहरी फुत्कार आहेत!
अगतिक व्यवस्थेवरती
हे पाशवी बलात्कार आहेत!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Sunday, July 10, 2011

स्वप्नांचा गर्भपात

शेतकर्‍यांची जाहीर फसवणूक
बघता बघवत नाही.
बेणे एवढे कडू की,
पेरलेलेही उगवत नाही.

शेतकर्‍यांच्या डोळय़ामधले
रानच्या रान चिबडले जाते!
मातीमध्ये पेरलेले स्वप्न
मातीमध्येच गाभडले जाते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

Saturday, July 9, 2011

लोकशाहीचा पाचवा स्तंभ

चार-चार स्तंभांनाही
जणू लोकशाही पेलत नाही.
लोकपाल विधेयकाची भाषा
जनता उगीच बोलत नाही.

घटनात्मक चौकटीतच
नक्की वागायला पाहिजे !
लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणून
लोकपालाकडे बघायला पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, July 7, 2011

देहली बेली

शिवराळ संवाद तर आहेतच,
शिव्यांचीही गाणी झाली आहेत.
सिनेमा पाहून लहान मुलं
भलतीच ज्ञानी झाली आहेत.

त्याला अश्लिल कसे म्हणावे?
जे सेन्सॉर झाले आहेत !
आमिरचा इडीयटपणा बघून
सारे जमींपर आले आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, July 6, 2011

भक्तांचा दानधर्म

देव भक्तीचा भुकेला तरी,
भक्तांकडून परीक्षा पाहिली जाते.
कधी उघड,कधी छुपी
देवालाच संपत्ती वाहिली जाते.

देव तर श्रीमंतच,
मग पैसा श्रीमंताला दिला जातो !
त्यालाच दानधर्म म्हणतात
जो पैसा गरजवंताला दिला जातो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, July 4, 2011

आर्ट ऑफ लिव्हिंग

नवरा-बायको म्हणजे
संसाराचा मुख्य पार्ट आहे.
जोडीदाराच्या कलाने घेणे
हे सुद्धा एक आर्ट आहे.

जेंव्हा नवरा-बायकोला वाटते
जोडीदार म्हणजे बला आहे !
तेंव्हा कळते संसार म्हणजे
जीवन जगण्याची कला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, July 3, 2011

अनुभवाचे बोल

दाबलेला विद्रोही आवाज
कसाबसा उसळला गेला.
नामदेवाचा संयम
अखेर ढासळला गेला.

आपला जो ’गोलपीठा’झाला,
तो रामदासाचा होवू नये.
उष्टावळ न देणारांनी
भरल्या ताटाचे आवतन देऊ नये.

फक्त कवितेपूरते ठीक होते,
या सत्तेत जीव रमत नाही !
अनुभव हाच खरा गुरू
यात कुणाचेच दुमत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, July 2, 2011

आधुनिक कॉलीदास

त्याचा तिला,तिला त्याचा
निरोपांचा उत असतो.
कालीदासाचा तो मेघदूत,
यांचा’मोबाईल दूत’ असतो.

आषाढाची वाट कुणाला?
प्रत्येक क्षण प्यारा असतो !
एस.एम.एस.च्या जोडीला
मिसकॉलचा मारा असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

वडे घ्या वडे ss

शिव वड्याच्या स्पर्धेत
आता छत्रपती वडा आहे.
सेनेच्या गाड्याशेजारी
स्वाभिमानचा गाडा आहे.

जाणत्या राजाच्या नावाने
जनताही वडे चापते आहे !
राजकीय वडे तळण्यासाठी
कढईत तेल तापते आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, July 1, 2011

राजकीय मुत्सद्दीपणा

तो तिच्या प्रेमात पडला,
ती त्याच्या प्रेमात पडली.
दोघांचा पक्ष वेगळा
एवढी गोष्ट मात्र नडली.

त्यांनी प्रेमाचाही प्रश्न मग
अगदी राजकीय पद्धतीने सोडला !
’प्रेम सलामत तो पक्ष पचास’
असे म्हणीत नवा पक्ष काढला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका19एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -317वा

दैनिक वात्रटिका 19एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -317वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Hd6EtBLdFyAAoFz3kRowp...