Friday, November 30, 2012

व्यवहारीक सत्य

कोणताही भ्रष्टाचार म्हणजे
एक प्रकारची कुटीलता असते.
भ्रष्टाचार करणे सोपे,
त्याच्या सिद्धतेत जटीलता असते.

देणार्‍याने दिल्याशिवाय
घेणारा काही घेत नाही !
भ्रष्टाचार व्यवहार झाल्याने
भ्रष्टाचार सिद्ध होत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

चोरांची शिरजोरी


Thursday, November 29, 2012

व्यंगचित्र ते फेसबुक

असिम त्रिवेदीचे व्यंगचित्र असो,
वा पालघरचे फेसबुक प्रकरण
हा कायदेशीर गुंता आहे.
कायदा कसा वापरावा?
याचीच पोलिसांना चिंता आहे.

अति घाई,संकटात नेई
हाच यातला समान धागा आहे !
हक्क आणि कर्तव्याची
एक आपापली जागा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सोशल पोस्ट मार्टेम


Wednesday, November 28, 2012

ग्रामपंचायतनामा

घरा-घरात लागले वाद
नात्या-गोत्याचेही मुडदे पडले.
जाती-धर्माच्या सलोख्यावरही
कायमचेच पडदे पडले.

जे व्हायचे ते झाले,
जे होवू नये तेही झाले आहे !
कुणाचे लागले कुपाट,
कुणाचे घोडे गंगेत न्हाले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

गावो-गावची कहाणी


Tuesday, November 27, 2012

एका स्मारकाचे कवित्त्व

ते मनोहर असले तरी
भलतेच जोश्यात आहेत.
"कयदा हातात घ्या"
अशाच त्वेशात आहेत.

जोश आणि त्वेश समजू शकतो
पण हा कायदेप्रधान देश आहे !
प्रिन्सिपॉल प्रिन्सिपल विसरल्याने
कपाळावरती चिंतेची रेष आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

ग्रामपंचायतीची आकाशझेप


Monday, November 26, 2012

खरेदी-विक्री

मतदान खरेदीची पद्धत
कावेबाज आणि कपटी असते.
राजकीय नशा चढत जाते
सोबतीला बोटी आणि चपटी असते.

कधी चिकन,कधी काजू करी,
वरून लालेलाल तर्री असते !
जे खाण्या-पिण्यावर विकत्ले जातात
त्यांच्यापेक्षा वेश्या तरी बरी असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

लोकशाहीचे बोन्साय


Sunday, November 18, 2012

अखेरचा जय महाराष्ट्र


हृदयाच्या सम्राटाला
सैनिकांनी हृदयात फ्रेम केले होते.
राजकीय मित्रांनीच काय?
राजकीय शत्रूंनीही प्रेम केले होते.

ओठात एक,पोटात एक
याचा त्यांना तिटकारा होता.
ठाकरी शैलीच्या आसूडासोबत
कुंचल्याचा फटकारा होता.

त्यांच्या अखेरच्या जय महाराष्ट्रने
हृदया-हृदयाला चरका आहे !
अमोघ वाणी आणिे कर्तृत्त्वाला
हा महाराष्ट्र पोरका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

Thursday, November 15, 2012

जाहीर लिलाव

बिनविरोधाच्या नावाखाली
सगळे काही झाकले जाते.
ग्रामपंचायतीचा लिलाव होवून
सरपंचपद विकले जाते.

अर्थशाहीच्या नावाखाली
लोकशाहीचा आव असतो !
जो जास्त विरोध करेल
त्यालाच जास्त भाव असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

Friday, November 9, 2012

आरोपीच्या पिंजर्‍यात


आत्मनिरीक्षण

यशस्वी पुरूषाच्या मागे
एक समान खुबी असते.
प्रत्येक ओबामाच्या मागे
एक मिशेल उभी असते.

खरे-खोटे पाहण्यासाठी
स्वत:त डोकावून पहायला हवे !
आपल्याही मिशेलच्या मागे
ओबामाने उभे रहायला हवे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 5, 2012

कटू सत्य

तेच सत्य मानले जाते
जे आपल्याला रूचले जाते.
तेच सत्य पचविले जाते
जे आपल्याला पचले जाते.

सत्याच्या आवडी-निवडीचा
इथेच खरा गफला आहे !
जो सोयीचे सत्य सांगेल
तोच फक्त आपला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

गुन्हेगारीचे मोजमाप


Saturday, November 3, 2012

शोध-प्रतिशोध

टिकेवर प्रतिटिका झाली,
वारावर प्रतिवार आहेत.
आता शोध सुरू झाले
कुणाच्या पक्षात
किती गुन्हेगार आहेत?

गुन्हेगार शोधायचेच झाले तर
सर्वच्या सर्व धरावे लागतील !
शुद्धीकरण कारायचे म्हटले तर
पक्षच बरखास्त करावे लागतील !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

आग ही आग


Friday, November 2, 2012

लाचारी जिंदाबाद

इकडेही मौज आहे,
तिकडेही मौज आहे.
ज्याच्या त्याच्या दिमतीला
लाचारांची फ़ौज आहे.

जसा विचार आहे
तसाच आचार आहे !
लाचारांच्या फौजेकडून
लाचारीचाच प्रचार आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

daily vatratika...19march2024